कवितेवर बोलू काही भाग 2
नमस्कार मंडळी मागील भागामध्ये मी तुम्हाला कविता कशी होते ते सांगितले किंवा कविता कशी लिहिली जाते ते सांगितले. पण आज आपण पाहणार आहोत कवितेचे प्रकार कोणते मुख्य म्हणजे सर्वात जास्त आणि अलगद या प्रकारच्या कविता होतात उदाहरणार्थ:-चारोळी, अभंग, मुक्तछंद, कविता रचणे, बालकविता, गझल, अशा कितीतरी प्रकारात ही कविता मोडली जाते. प्रत्येक प्रकाराची एक वेगळी शैली आहे, एक वेगळेच महत्त्व आहे.
चारोळी काव्य प्रकार :- हा प्रकार सरळ आणि साधा फक्त चार ओळींमध्ये बसणारा प्रकार म्हणून याला चारोळी म्हणतात. या मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक येते.
वाऱ्यालाही भेदून
करून जाईल पार
जरी वादळ आले तरी
मानणार नाही हार
ही छोटीशी पण परिवर्तनात्मक चारोळी तुम्हाला समजण्यास मदत करेल.
अभंग :- हा खास प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला काव्यप्रकार आहे. तसेच अभंग हा एक वृत्त-छंदहीआहे. काव्यप्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी या वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला. , संत तुकाराम महाराज,संत नामदेव महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज इत्यादी संत होऊन गेले.
चला तर मग ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा आस्वाद घेऊ.......
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा । विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥ १ ॥
वेधलें वो मन तयाचियां गुणीं । क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥ २ ॥
पौर्णिमेचे चांदणे क्षणक्षणा होय उणे । तैसे माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥ ३ ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि पुरे । चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥ ४ ॥
अभंगांचे दोन प्रकार म्हणजे एक चार चरणांचा आणि दोन चरणांचा आहे. चार चरणांचा अभंगाचे पहिल्या तीन चरणामध्ये सहा- सहा अक्षर असून शेवटच्या चरणात चार अक्षर असतात.
उदा:- हा खालील सोपा अभंग पाहिल्यास तुम्हाला समजेल....
आषाढी कार्तिकी। पंढरीची ओढ।
मुखी नाम गोड। पांढुरंग।
चालती पाऊले। पंढरीची वाट।
वारीचा तो थाट।काय वर्णू।
दोन चरणांचा अभंगाचा प्रत्येक चरण मध्ये आठ- आठ अक्षर राहतात आणि शेवटी यमक येतो.
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।
मुक्तछंद कविता : - या कवितेच्या प्रकारात कविता सहज आणि अलगद दोरा उसवत जावा तशी कविता पानावर उतरते. यमक जुळतोय का नाही यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही . या कविता प्रकाराप्रमाणे मुक्त असतात, स्वच्छंद असतात. याला कशाची चौकट नसते पण आशय असला पाहिजे. म्हणून या प्रकाराला मुक्तछंद असे म्हणतात.
या प्रकारातील एक कविता उदाहरण म्हणून तुम्हाला दाखविते म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल.
तू गेलीस तरी
आठवतेस तू
प्रत्येक क्षणात
साठतेस तू
आठवणींच्या सागरात
दाटतेस तू
ओढ्यावर,
गच्चीतील गप्पांवर
साक्ष असलेल्या कट्ट्यांवर
गुपितं सांगणाऱ्या
त्या वृंदावणावर
आठवतेस तू
बोलत गेलेल्या त्या वाटांवर
घेऊन गेलेल्या त्या शेतांवर
नेऊन सोडलेल्या त्या काठांवर
आठवतेस तू.....
आठवतेस तू.....
बालकविता :- बाल कविता या लहान मुलांच्या वर लिहील्या जातात. त्यांना आकर्षून घेण्यासाठी कवितेचा उपयोग होतो . काही नवीन शिकण्यासाठी मदत होते. कुठलाही विषय किंवा कोणतीही गोष्ट त्यांना सांगण्यास या कवितांची मदत होते आणि मुले उत्साहाने शिकतात.
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे
वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे
सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे....
किती छान आहे ही कविता मन अगदी उडून बालपणातच गेले. ही कविता बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची आहे. यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत.
गझल :- गझल प्रकार हा जरा अवघड प्रकार आहे . गझल हा वृत्तप्रकार व काव्याचा तसेच गायनाचा प्रकार आहे. इस्लामी संस्कृती कडून गझल प्रकार कळला, तेराव्या शतकातील सुफी संत तुघलक साम्राज्याचा राजकवी अमीर खुसरो यांच्यामुळे हा गझल प्रकार नावारूपाला आला.
गझले मध्ये साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरा म्हणतात. तुम्हाला उदाहरण म्हणून माझी आवडती सुरेश भटांची गझलेचा नजराणा खास माझ्या काव्य प्रिय मित्र मैत्रिणीसाठी....
हे तुझे अशा वेळी लाजने बरे नाही
हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही
व्वा किती अप्रतिम आणि किती वेगळी रोमँटिक गझल आहे आदरणीय सुरेश भटांची ही गझल.
हे झाले कवितेचे काही प्रकार मी तुम्हाला सांगितले. आशा करते की माझी माहिती आपल्याला उपयुक्त ठरावी. अशे अजून खूप प्रकार या काव्यसागरात आहेत पण ते पुढे कधी तरी पाहूच. पुढे सुद्धा असेच ब्लॉग वेगवेगळ्या विषयांवर तुमच्यासाठी खास घेऊन येत राहीन. तत्पूर्वी ब्लॉग आवडल्यास comment, share नक्की करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा